पुणे: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळादरम्यान धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे आरोपही करण्यात आले. त्या सर्व गोंधळानंतर भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला टीकस्त्र सोडले आहे.
किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले...
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. त्या टीकेवर पलटवार करताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल बोलत असावेत. कारण, इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात आहे, भाजपल नाही.