लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार, अशी चर्चा गुरुवारी दिवसभर होती. प्रत्यक्षात ही भेट झालीच नाही. राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले.
‘लोकमत’ने राजभवनशी संपर्क साधला असता कोणतीही भेटीची वेळ राज्यपालांकडे मागण्यात आली नाही, अशी माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी साडेचारच्या सुमारास राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीसाठी वेळ द्यावी, अशी विनंती केली. आज दिवसभर राज्यपालांचे पूर्वनियोजित पाच कार्यक्रम होते. उद्यापासून तीन दिवस राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर असतील.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी एका पुस्तक प्रकाशनासाठी राजभवनावर गेले होते. यावेळी राज्यपालांशी त्यांनी सुमारे २० मिनिटे चर्चा केली.
गेल्या आठवड्यात आपली राज्यपालांशी नामनियुक्त सदस्यांबाबत चर्चा झाली आणि आम्ही त्यांना पुन्हा भेटणार आहोत, असा दावा अजित पवार यांनी पुण्यात केला होता. मात्र, या विषयावर चर्चा झाल्याचाही राजभवनने इन्कार केला.
आता राज्यपालांची भेट १ सप्टेंबरनंतरच शक्यभेटीची वेळ घेण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर रात्री राजभवनवर गेले. ‘माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि शिष्टमंडळ येणार असल्याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. लगेच वेळ देता येणे शक्य नाही’ असे राज्यपालांनी नार्वेकर यांना सांगितले. याबाबतच्या बातम्यांवरही राज्यपालांनी आश्चर्य व्यक्त केले. आता १ सप्टेंबरला राज्यपाल मुंबईत परतल्यानंतरच भेट होईल, असे मानले जाते.