बिहार निवडणुकीनंतर आता भाजपाने सारे लक्ष पश्चिम बंगालकडे वळविले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच प. बंगालचा दौरा केला. राज्यपाल जगदीप धनखड़ आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद सवश्रूतच आहेत. यातच ममता यांच्या एका मोठ्या मंत्र्याने निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने ममता संकटात सापडल्या आहेत. रविवारी भाजपाच्या खासदाराने केलेले वक्तव्य निवडणुकीआधी प. बंगालमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचे संकेत देत आहे.
भाजपा खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना १४९ चे बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात असे वक्तव्य केले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तृणमूलच्या नेत्यांनी भाजपावर लोकशाहीप्रती कोणताच आदर नसल्याचे म्हटले आहे.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष खान यांनी जलपाईगुडीमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षात सध्या उलथा पुलथ सुरु आहे. यामुळे त्यांचे सरकार विधानसभेत बहुमतात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणाले. आमदार ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त करत तृणमूल काँग्रेस सोडत आहेत, ते पाहता राज्यपाल लवकरच बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात, शक्यता अधिक आहे. ममतांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजपात येण्यासाठी तयार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
तृणमूलचा पलटवारभाजपाच्या खासदारांना तृणमूलचे खासदार सौगत ऱॉय यांनी उत्तर दिले आहे. भाजपाचे नेत्यांना संविधान आणि त्यातील तरतूदींबाबत काहीही माहिती नसते. खान यांना कसे समजले की, राज्यपाल अशाप्रकारचे पाऊल उचलणार आहेत.? लोकांनी निवडून दिलेल्या सरकारबाबत अशाप्रकारे वागविले जाऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला १४९ नाही तर २१८ एवढे मोठे बहुमत आहे. पश्चिम बंगामध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. तर पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागले आहे. त्यातच गेल्या काही काळापासून तृणंमूल काँग्रेसमध्ये नाराज असलेले ममता सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.