मुंबई : राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. (governor office was informed the day before yesterday by CMO.)
राजभवनाने राज्यपालांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते, असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून राज्यपालांचा हा अवमान असल्याचं म्हटलंय. तसेच, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच माफी मागावी, असेही ते म्हणाले.
तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी, राज्याबाहेरील वैयक्तिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारच्या विमानाचा लाभ घेणे योग्य नाही. राज्यपालांना परवानगी नसताना तिथे जाणे ठीक नव्हते. ज्या अधिकाऱ्याने त्याची माहिती दिली नाही त्यांची चौकशी व्हावी, असे म्हटले होते.
राज्यपालांसोबत नेमकं काय घडलं?उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, देहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे.