मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत. मात्र यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सरपंचपदासाठीचं आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या घोषणेकडे विजयी उमेदवार लक्ष देऊन आहेत. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मोठी घोषणा केली आहे.राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. यावेळी आरक्षण आधी जाहीर करण्यात न आल्याने मतदानामध्ये ४ टक्के वाढ दिसून आली आहे, असे हसन मुश्रिफ म्हणाले. तसेच राज्यातील ग्रामपंचातींच्या आरक्षणाची सोडत पुढच्या आठ ते दहा दिवसांत घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे हसन मुश्रिफ यांनी सांगितले.राज्यातील अनेक ग्रामपंचातयींमध्ये सध्या प्रशासक आहे. त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. एका अधिकाऱ्याकडे चार-पाच ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढच्या ८-१० दिवसांत घेऊन गावचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्याची सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना दिली गेली आहे. मात्र ग्रामसभा घेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई असेल, असे हसन मुश्रिफ यांनी सांगितले.