कल्याण – अनेकदा आपण राजकारणात पक्षांतरं पाहिली असतील, ज्याठिकाणी सत्ता असते तिथे जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचे डावपेच राजकारणात कधीच समजत नाहीत. मुरबाड तालुक्यात जो प्रकार घडलाय तो ऐकून तुम्हाला याची प्रचिती येईल. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीनंतर नवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारत होते.
त्यानंतर हेच पदाधिकारी संध्याकाळी भाजपा आमदार किसन कथोरे यांच्याकडे गेल्याचं पाहायला मिळालं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा हे तिन्ही पक्ष करत आहेत. २४ तासांच्या या राजकीय घडामोडींची चर्चा तालुक्यात पसरली, प्रमोद हिंदुराव यांनी निवडून आलेले सरपंच आमचेच असल्याचं सांगितले. तर भाजपा आमदार किसन कथोरे म्हणाले, हे सरपंच आमच्या पक्षाचे आहेत.
ग्रामपंचायती निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. याठिकाणी स्थानिक आघाडी, पॅनेल करून निवडणूक लढवली जाते, त्यामुळे पक्ष पुरस्कृत पॅनेल निवडून आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षात ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असा दावा सगळ्यांकडून केला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हेच चित्र पाहायला मिळालं, भाजपाने राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवल्याचा दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच नंबर वन असल्याचं सांगत होते, त्यात शिवसेना, काँग्रेसही मागे नव्हती.
मुरबाड तालुक्यात भुवन ग्रामपंचायतीचं सरपंच पद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आरक्षित होते, त्यामुळे याठिकाणी चुरस पाहायला मिळाली, दर्शना बांगर यांची सरपंचपदी तर सुनील बांगर यांची उपसरपंचपदावर निवड झाली. निवडीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दुपारी निवडून आलेल्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांची भेट घेतली, त्यावेळी सत्कार करताना सदस्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचं चिन्ह असलेला पट्टा घालण्यात आला. सोशल मीडियात भुवन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा असे मेसेज व्हायरल झाले.
सायंकाळी याच सदस्यांनी भाजपाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांची त्यांच्या बदलापूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, तेव्हा ही ग्रामपंचायत भाजपाकडे आल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला. तर सकाळी हेच सदस्य शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख सुभाष पवार यांच्या भेटीला गेले. तिथे शिवसेनेचा पट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत झाले. २४ तासांत घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.