- राजू इनामदार -
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला तोच मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तू ताण मी ओढतो ह्या भूमिकेमुळे.. आघाडी होऊनही न झालेली कुणा एकाची ‘माघार’ शेवटी ‘बंडखोरी’वर येवून ठेपली.. आणि... पाहायला मिळाला.. आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसाचा ' रिमेक ' ....
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. शिक्षणाने डॉक्टर आहेत. त्यातही मेंदूविकार तज्ज्ञ. इंदोर, बेळगाव, पुणे व नंतर अर्थातच घरच्या प्रवरा मेडिकलमधून त्यांनी पदवी घेतली. वयात आले त्यावेळी त्यांच्यासाठी संस्थानाचे सगळे दरवाजे खुले होते. मात्र त्यांना खुणवत होते ते राजकारणच! त्यामुळे डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही. तसा पेहरावही त्यांनी कधी केला नाही. वाढलेली दाढी, पांढरा झब्बा पायजमा व अगदीच कधी घातले तर त्यावर जाकीट असा साधाच पण राजकारणाशी नाते सांगणारा पोषाख ते कायम परिधान करतात. त्याबाबतीत त्यांनी आजोबा बाळासाहेब विखे यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. त्यांची राजकीय समजही विलक्षण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या एका सभेत त्यांनी चांगले भाषण केले, मात्र चुकुनही त्यांनी मुख्यमंत्री किंवा भाजपा यांच्यावर टीका केली नाही. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खासगीत बोलताना त्यांना याबाबत विचारले तर ते म्हणाले, ‘त्यांच्याकडे जावे लागले तर या टिकेचा त्रास होईल, मग कशासाठी करायची टीका?’ भाजपात त्यांचा प्रवेश झाल्यावर आता राष्ट्रवादीत हा किस्सा प्रसिद्ध झाला आहे. सूजय किंवा एकूणच विखे यांच्या अशा राजकारणामुळेच की काय पण पवार यांनी नगर दक्षिण मतदार संघ काँग्रेसला देण्याचे नाकारण्याबरोबरच सूजय यांना राष्ट्रवादीत घेणेही टाळले असावे. सूजय शैक्षणिक संस्थांमध्ये लक्ष घालत असतानाच कौटुंबिक आधारवड असलेल्या बाळासाहेब विखे यांचे निधन झाले. त्यापुर्वी बाळासाहेबांच्या माध्यमातून या घराण्यात सलग ४० वर्षे खासदारकी होती. बाळासाहेब असतानाच ती गेली होती. त्यांना ती फार खंत होती. सूजय च्या रूपाने पुन्हा खासदारकी घरात यासाठी असे त्यांना वाटत असल्याचे आता सांगण्यात येते. खरेखोटे त्यांनाच माहिती, पण सूजय यांनी राजकारणातील आपला रस कधीही लपवून ठेवला नाही. लहानमोठ्या पदांपेक्षा थेट खासदारकीलाच हात घालण्याचे त्यांनी कधीचेच ठरवून टाकले होते. याही बाबतीत त्यांनी आजोबांचाच वारसा चालवला आहे. नगर दक्षिण हा मतदारसंघ त्यांना सोयीचा वाटला. तिथे त्यांनी मागील दोन वर्षांपासून लक्ष घालण्यास सुरूवात केली. काँग्रेसकडून उमेदवारी मिळणारच असा त्यांचा ग्रह असेल, पण राजकारण म्हणजे काय याचा त्यांना पहिला धडा उमेदवारीसाठी धडपड करावी लागली तेव्हाच मिळाला. राष्ट्रवादीने मतदारसंघ बदलासाठी नकार दिला. पण सूजय मागे हटले नाहीत. हवे तर भाजपात प्रवेश करेल, तेही नाही झाले तर अपक्ष निवडणूक लढवेल असे जाहीरपणे म्हणून त्यांनी धूर्तपणे आपल्या नावाची हवा तापवत ठेवली व त्याचा योग्य उपयोग होईल याची काळजीही घेतली. इथेही त्यांनी राजीव गांधी यांच्या विरोधात दिल्लीमध्ये खासदारांचा ‘विचार मंच’ स्थापन करणाºया आजोबांचाच कित्ता गिरवला आहे. भाजपातील त्यांचा प्रवेश वडिल राधाकृष्ण यांच्या राजकारणासाठी तापदायक ठरेल यांची त्यांना कल्पना नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. फक्त वडिलच नाही तर आई शालिनी याही जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्याच अध्यक्ष आहे. तरीही त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तत्पुर्वीच त्यांनी खास बाळासाहेबांची म्हणून असलेली स्वतंत्र निवडणूक यंत्रणा कार्यरत केली असणार. वेगवेगळ्या संस्थांमधील कर्मचाºयांच्या नियुक्त्या झाल्या असतील. नगर दक्षिण च्या प्रत्येक तालुक्यातील नातेवाईकांच्या, पुन्हा त्यांच्या नातेवाईकांच्या याद्या तयार झाल्या असतील. त्यांच्याशी संपर्कही सुरू झाला असेल. काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच असा पणच त्यांनी केलेला दिसतो आहे. नातवाचे पाऊल आजोबांच्या पावलावर पडते आहे असेच यासंदर्भात जुनेजाणते म्हणत आहेत. राजकारणातील ही पहिलीच लढाई सूजय जिंकतात की हरतात यापेक्षा ते ही लढाई लढतात कशी हेही महत्वाचे ठरणार आहे.