मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत, अनेकदा सामाजिक विषयांवर त्या फेसबुक लाईव्ह करतात. खासदार म्हणून मतदारसंघात केलेली कामे, भेटीगाठीचे फोटोही टाकत असतात. पण रविवारी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत आईचा आनंद गगनात मावेना हे दाखवून दिलं.
मुले गाडी चालवायला शिकतात तेव्हा पालकांना वेगळाच आनंद असतो, मग कोणीही त्याला अपवाद ठरत नाही. रविवारी सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने आजोबा शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य केले. अलीकडेच विजयला वाहन चालवण्याचा परवाना मिळाला आहे. त्यानंतर त्याने आई सुप्रिया सुळे आणि शेजारी आजोबा शरद पवार यांना बसवून गाडीचा फेरफटका मारला. सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला होता.
एक आई म्हणून जेव्हा आपला मुलगा गाडी चालवतो हे पाहून सुप्रिया सुळे आनंदात होत्या. त्यांनी या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या. आजोबा शरद पवारांनासोबत घेऊन गाडी चालवणाऱ्या विजयला आई स्पीड हळू ठेव, हॉर्न वाजवू नको अशा सूचना दिल्या तसेच आपल्या गाडीवर एल म्हणजे लर्निंग चिन्ह आहे हे सांगायलाही विसरल्या नाहीत. मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवतात हा आनंद काही औरच असतो. स्पीड लिमीट काय आहे माहिती आहे ना? असं आई मुलाला गाडी चालवताना विचारतात.
आई म्हणून या छोट्या गोष्टी असतात, पण त्याचा आनंद मोठा असतो, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या व्हिडीओत शेजारी बसलेले शरद पवार नातू विजयला हाताच्या इशाऱ्याने गाडी चालवण्याची सूचना देतानाही दिसतात. यापूर्वी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांनीदेखील आजोबांच्या गाडीचं सारथ्य केले होते. अनेक माध्यमांनी ही दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. आजोबा शरद पवारांना मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयातून घरी नेण्यासाठी रेवती कार्यालयात आली होती. नात आपल्याला घ्यायला आली म्हटल्यावर आजोबाही तिच्याच कारमध्ये बसले होते.