शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरून आक्रमक झालेले २३ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर नरमले असल्याचे संकेत मिळत आहेत. या नेत्यांना ‘ग्रुप२३’ या नावाने ओळखण्यात येऊ लागले होते.
ग्रुप२३ मधील आक्रमक नेते गुलाम नबी आझाद यांनी काल झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य टिकविणे हीच अहमद पटेल यांना खरी श्रंद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. पक्ष सध्या गंभीर संकटात आहे. मोदींचा मुकाबला करण्यासाठी आपणास ऐक्य टिकवायला हवे. अन्यथा भाजपा लाभ उठवेल, असे आझाद म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रुप२३ मधील एका वरिष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले की, अहमद पटेल हे आजपर्यंत पक्ष नेतृत्व आणि आमच्यातील दुवा म्हणून काम करीत होते. ते आमच्या मताशी सहमत असून पक्ष नेतृत्वास समजावतील, असे आम्हाला वाटत होते. त्यांच्या मृत्यूमुळे मध्यस्थी करणारा कोणी नेताच आता उरलेला नाही.
या नेत्याने सांगितले की, आम्ही केवळ २३ जण नसून आमच्या सोबत नेत्यांची लांबच लांब रांग आहे. आमच्यातील कोणीही पक्ष फोडणार नाही, अथवा सोडूनही जाणार नाही. आमचे सारे आयुष्य काँग्रेससोबत गेले आहे. अहमद पटेल यांच्या जाण्याने नेतृत्व आणि आमच्यातील कडी तुटली आहे. अशा वेळी सर्वांनी एकजूट होऊन काँग्रेसला मजबूत करायला हवे. सोनिया गांधी यांनी सर्व चर्चित नावांना बाजूला सारून माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांची कार्यकारी कोषाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे अहमद पटेल यांच्या जबाबदाऱ्या तात्काळ प्रभावाने देण्यात आल्या आहेत.