साबरकांठा – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपा(BJP) १०० नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. त्यामुळे जिंकणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक होणार असून यात नो रिपीट थेअरी वापरत अनेकांचं तिकीट कापणार आहेत. हिंमतनगर समितीच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या १८२ जागांपैकी ७० जागा भाजपाकडे नाहीत. या ७० जागांसोबत ३० विद्यमान आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. याठिकाणी कुणीही कायमस्वरुपी नाही. हिंमतनगरचे आमदार राजेंद्र सिंह चावडा हेदेखील नाही. मी स्वत: खासदार म्हणूनही कायम स्वरुपी नाही. कुणालाही या गोष्टीचं वाईट वाटण्याची आवश्यकता नाही असंही ते म्हणाले.
तसेच आगामी निवडणुकीत कुणीही कार्यकर्ता तिकीट मागू शकतो. कार्यकर्त्यांनी हे करावंच. संघटनेने नव्या चेहऱ्यांना पक्षात स्थान दिलं आहे. असे नवे चेहरे ज्यांना निवडणूक लढण्याची कधीही संधी मिळाली नाही. तिकीट देण्यापूर्वी पक्ष विविध सर्व्हे करतो. तिकीट वरिष्ठ पातळीवर निश्चित होतं. आमदारानं किती काम केले? किती काम केले नाही? या आधारावर उमेदवारी देण्याचा निर्णय होतो असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपाने अलीकडेच राज्यात नो रिपीट थेअरी वापरत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मंत्र्यांमध्ये फेरबदल केले आहेत.
भाजपाकार्यकर्त्याना चिंता नको, नोकरी आरामात मिळेल
भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही. भाजपा कार्यकर्त्याला सहजपणे नोकरी मिळू शकेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असायला हवा, हे निश्चित असं आश्वासनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.