वडोदरा – स्थानिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी(Vijay Rupani) यांची तब्येत अचानक बिघडल्याने व्यासपीठावर कोसळल्याची घटना घडली आहे. भाषण करताना मुख्यमंत्री रूपाणी यांना चक्कर आली आणि ते मंचावर खाली कोसळले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आलं, विजय रूपाणी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांना बडोदा येथून अहमदाबाद येथे आणलं आहे. (Gujarat CM Vijay Rupani faints on stage at poll rally in Vadodara)
माहितीनुसार, गुजरातमध्ये सध्या ६ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याच प्रचारासाठी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे बडोदा येथे पोहचले होते, याठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री रूपाणी यांना चक्कर आली. त्यांचा बीपी(Blood Pressure) कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. विजय रूपाणी यांना बडोदा येथून सरकारी विमानाने अहमदाबाद येथे आणण्यात आलं, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अहमदाबादच्या यू.एन मेहता हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू आहेत.
पुढील काही दिवस डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असून त्यानंतर डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल. रूपाणी मंचावरच बेशुद्ध झाल्याने कार्यक्रमात खळबळ माजली. त्यानंतर काही काळानंतर परिस्थिती सर्वसामान्य झाली. दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून रूपाणी अस्वस्थ असल्याची बातमी मिळाली, सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती सुधारतेय, ते लवकरात लवकर बरे होतील असं ट्विट करून माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून केली विचारपूस
विजय रूपाणी यांच्या तब्येतीबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतंही मेडिकल बुलेटीन जारी केले नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी फोनवरून रूपाणी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. मोदी यांनी विजय रूपाणी यांना नियमित तपास आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रूपाणी यांची बडोदा येथे तिसरी रॅली होती, बडोदा शहराध्यक्ष डॉ. विजय शहा म्हणाले की, विजय रूपाणी व्यासपीठावर बेशुद्ध झाले. त्यानंतर मी त्यांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर ते व्यासपीठापासून कारपर्यंत व्यवस्थित चालत गेले होते.
गुजरातमध्ये स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर २८ फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. नगरपालिका निवडणुकांचे निकाल २३ फेब्रुवारीला घोषित केले जातील. तर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल २ मार्च रोजी लागणार आहेत.