गांधीनगर : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातच्या सर्व जागा जिंकून भाजपने कॉँग्रेसला मोठा धक्का दिला होता. यावेळीही असाच पराक्रम करण्याचा भाजपचा मानस असला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसने दिलेली टक्कर बघता कॉँग्रेस भाजपला रोखण्याची शक्यता आहे.मागील वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसच्या मतांचा टक्का ३८.९ टक्क्यांवरून वाढून ४१.४ टक्क्यांवर गेला. तसेच भाजपचीही मते ४७.९ टक्क्यांवरून ४९.१ टक्कयांवर गेली. मात्र जागांमध्ये कॉँग्रेसला लाभ झाला तर भाजपचे नुकसान. पाटीदारांचे राखीव जागांसाठी झालेले आंदोलन, नोटाबंदी, जीएसटी अशा कारणांनी भाजपला मोठे नुकसान सोसावे लागले. विविध आंदोलनामधून पुढे आलेल्या हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी या नेत्यांमुळेही कॉँग्रेसला लाभ झालेला दिसून आला.या पार्श्वभूमीवर सध्याच्या लोकसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कॉँग्रेसने गुजरातमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना मिळालेला चांगला प्रतिसाद कॉँग्रेसच्या आशा वाढविणारा होता. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान हार्दिक पटेल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला नकार, त्यामुळे त्यांना लढविता न आलेली निवडणूक, अल्पेश ठाकूर यांनी दिलेला कॉँग्रेसचा राजीनामा अशा काही बाबी कॉँग्रेसची चिंता वाढविणाऱ्या ठरल्या आहेत.या वेळी वेगळे काय?गांधीनगरमधून यावेळी लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी भाजप अध्यक्ष अमित शहा रिंगणात.अडवाणींना डावलले गेल्याने काही कार्यकर्तेनाराज. या नाराजीचा फटका बसू शकतो.भाजपने सहा विद्यमान खासदारांना तिकिटेदिली नाहीत. यापैकी दोन ते तीन जणांची आपणहूनच माघार. अन्य खासदार नाराज.तेही पक्षाला भोवू शकते.भाजपमधील नाराजी, विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा मिळालेला पाठिंबा यामुळे कॉँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या. काँग्रेसचे मिशन १३.
गुजरात: मोदी यांच्या बालेकिल्ल्यामध्येच काँग्रेसने दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:49 AM