नवी दिल्ली - गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर आगामी पंचायत निवडणुका व 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा उत्कृष्ट प्रदर्शन करेल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केला आहे. रुपाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हा आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे" असं विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस समाजात अफवा पसरवून निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करते. मात्र गुजरातच्या जनतेने त्यांना यशस्वी होऊ दिलं नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी रूपाणी यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. तसेच आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे असं म्हटलं होतं.
एका वृत्तानुसार, काँग्रेसच्या माजी आमदाराला 25 कोटी रुपयांना खरेदी केले आणि तिकिट दिले, असा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला होता. यावर उत्तर देताना विजय रुपाणी यांनी काँग्रेस आपल्या आमदारांचा सन्मान करत नाही आणि पक्ष सोडल्यानंतर असे आरोप केले जातात. तसेच, संपूर्ण गुजरात काँग्रेसला 25 कोटी रुपयांत खरेदी केले जाऊ शकते असे विजय रुपाणी म्हटलं होतं.
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार येण्याची दाट शक्यता
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच सुसाट सुटलेल्या महागठबंधनची आता मात्र पिछेहाट होताना दिसत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनचं सरकार येईल, असे अंदाज वर्तवले होते. मात्र हे अंदाज आता चुकीचे ठरताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलानं (जेडीयू) मुसंडी मारली आहे. त्यामुळे सध्याचे आकडे पाहता बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे.