गांधीनगर :गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Corporation Election 2021 Result) सुरू आहे. एकूण ६ महानगरपालिकांमधील ५७६ वॉर्डांमध्ये मतदान घेण्यात आले. ताज्या कलांनुसार, सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर आहे. सुरत, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून, प्रथमच या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. (gujarat municipal corporation election 2021 result aap defeating congress at surat)
आम आदमी पक्षाने काँग्रेसला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सुरत महानगरपालिकेच्या एकूण १२० जागांपैकी भाजप तब्बल ५६ जागांवर विजयी झाला आहे, तर, आपने ९ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार केल्यास काँग्रेसही ८ जागांवर पुढे आहे. सुरतमध्ये आम आदमी पक्षाला पाटीदार समाजामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.
MIM कडे मतदारांची पाठ
गुजरातमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा फारसा प्रभाव पडलेला पाहायला मिळाला नाही. एकूण २१ जागांवर एमआयएम पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे.
गुजरातमधील महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजयी षटकार, तर काँग्रेसची झाली अशी अवस्था
बसपा तीन जागांवर विजयी
जामनगर महानगरपालिकेत काँग्रेसला मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. तर बहुजन समाजवादी पक्षाने तीन जागांवर विजय मिळवता आलेला नाही. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत.
विजय रुपाणींनी मानले मतदारांचे आभार
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबाबत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. सर्व सहा महानगरपालिकांमधील मतदारांना मी धन्यवाद देतो. भाजप कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास कधी तुटू देणार नाही, असे आश्वासन विजय रुपाणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले.
अमित शहा अहमदाबादला रवाना
गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच केल्यानंतर केंद्रीय अमित शहा अहमदाबाद येथे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. येथे होणाऱ्या विजयोत्सवात अमित शहा सहभागी होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.