अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. (Gujarat municipal election 2021 Result ) आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाने सहा पैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे.अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल समोर आली असून, त्यामध्ये भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत.सूरतमध्ये आतापर्यंत १२० जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपा ५१ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील ७२ पैकी ५२ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे.जामनगरमधील संपूर्ण निकाल हाती आले असून, येथे भाजपाने ५१ जागांवर बाजी मारली आहे. तर काँग्रेसला १० आणि इतरांच्या खात्यात ३ जागा मिळाल्या आहे. तर भावनगरमध्ये ५२ पैकी ४८ जागांचे कल समोर आले आहेत. त्यापैकी भाजपाने ४० तर काँग्रेसने आठ जागांवर आघाडी मिळवली आहे.
गुजरातमधील महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजयी षटकार, तर काँग्रेसची झाली अशी अवस्था
By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 3:40 PM