Maharashtra Vidhan Sabha : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचीवैजापूरमध्ये सभा झाली. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदार रमेश बोरनारे यांच्यावर ठाकरेंनी या सभेतून टीका केली. वैजापुरातील सभेनंतर आमदार बोरनारे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंवर आमदार रमेश बोरनारे यांनीही सभेतून पलटवार केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोप त्यांनी एक किस्सा सांगितला.
"बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धव ठाकरेंना उलटे टांगले असते" "४० आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावला आहे. येणाऱ्या निवडणुकीत बोरनारे यांना पराभूत करून उलटे टांगा", असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
त्याला उत्तर देताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले, "काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिले असते, तर त्यांनीच तुम्हाला उलटे टांगले असते."
मी म्हणालो, "शिवसैनिक आत्महत्या करतील"
बोरनारे यांनी ठाकरेंवर पैसे घेऊन तिकीट देत होते, असा आरोपही केला. "मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र, मी त्यांना भेटून सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेसाठी किती काम केले. मी त्यांना म्हणालो की, "माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही, तर शिवसैनिक आत्महत्या करतील."
"माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळेच ते एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटले होते की, वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. पण, ते आले आणि टीका करून गेले", असे म्हणत बोरनारे यांनी ठाकरेंना डिवचले.