मुंबई – आज मैत्री दिन..कॉलेजमधील तरूण-तरूणींसाठी उत्साहाचा दिवस. पण राजकीय वर्तुळातही अनेक नेत्यांचे मैत्रीचे किस्से तुम्ही ऐकले असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घट्ट मैत्री अनेकांनी अनुभवली आहे. राजकारणात कितीही विरोध केला तरी या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीचे संबंध कधीच तुटले नाही. बाळासाहेब आणि शरद पवार हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी आहेत.
शरद पवार(Sharad Pawar) आणि बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) पहिली भेट झाली ती बी. के देसाई यांच्यामुळे. शरद पवार १९६७ साली बारामती येथून आमदार म्हणून निवडून आले तर १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांना भेटण्याआधी शरद पवारांनी बाळासाहेबांचे दसरा मेळाव्याचं भाषण ऐकलं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री झाली आणि ती आयुष्यभर टिकली. बाळासाहेब शरद पवारांना शरद बाबू म्हणून हाक मारत. १९६० मध्ये बाळासाहेबांनी फ्रि प्रेस जर्नलमधून नोकरी सोडली त्यानंतर शरद पवार यांच्यांशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी भागीदारीत एक मासिक काढायचा निर्णय घेतला.
‘राजनीती’ नावाचं हे मासिक होतं. या मासिकाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हे मासिक चालेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी दोन्ही नेते बाळासाहेबांच्या भगिनीकडे गेले होते. बाळासाहेबांच्या बहिणीमध्ये देवीचा संचार होत असे. अंगात आल्यावर त्यांना प्रश्न विचारले जात. त्या सांगतील ते खरं मानलं जायचं. बाळासाहेबांनी मासिकाबद्दल त्यांच्या बहिणीला प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी मासिकाची एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही असं सांगितलं. त्यानंतर हे मासिक चाललंच नाही. शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केल्याप्रमाणे म्हटलं की, बाळासाहेबांच्या भगिनींनी जे सांगितले तसेच घडले. हे मासिक विकलं गेलं नाही म्हणून ते प्रकाशकांकडेच पडून राहिले ते बाजारात आलेच नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्रित सुरू केलेला हा प्रकल्प त्यांना गुंडळावा लागला.
१९८२ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचे संपामुळे वातावरण गरम होते. पुलोदचा प्रयोग यशस्वी करून शरद पवारांनी वेगळी चुल मांडली होती. राज्यात अंतुले यांची सत्ता गेल्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. १९८२ च्या दसरा मेळाव्यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस एकाच व्यासपीठावर आले होते. याच काळात चंद्रगुप्त मोर्याने सिंकदरला हाकलले तसे काँग्रेसची सत्ता हाकलून लावा. पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील असं विधान बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. पुढे जाऊन बाळासाहेबांची ती भविष्यवाणी खरी ठरली आणि शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं.
पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत. एका भाषणात शरद पवार म्हणतात की, ‘‘सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचा उमेदवार कोण? तर ते चिडले, अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का? असे म्हणाले व सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली. कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अजोड होते अशा शब्दात पवारांनी बाळासाहेंबांसोबत असलेल्या मैत्रीचं कौतुक केले होते.