Maharashtra Vidhan Sabha: समरजीत सिंह घाटगेंपाठोपाठ इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. सोमवारी (७ ऑक्टोबर) त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धना पाटलांना लोकसभा निवडणुकीआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते, असा राजकीय गौप्यस्फोट केला.
जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांना केलेला फोन, काय झालं होतं बोलणं?
"२०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले. पण, हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना मी असं म्हटलं तर काही वावगं नाही की, तुम्ही स्वगृही येत आहात. कारण मूळ घर तुमचं हेच होतं. तुम्ही यापूर्वीच यायला पाहिजं होतं, पण आमच्या घरात गर्दी होती. तुम्हाला येता आलं नाही. आज तुम्ही येत आहात, याचा आम्हाला आनंद आहे", असे जयंत पाटील म्हणाले.
"अनेक ठिकाणी लोक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. गेले अनेक दिवस मला वाटतं होतं की, हर्षवर्धन पाटलांनी देखील हा मार्ग अनुसरावा. त्यांच्याशी संपर्क केला, लोकसभेच्या आधीपासून; आत्ता नाही. लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला. मी त्यांना (हर्षवर्धन पाटील) म्हटलं की बघा. काही जमलं तर आपल्याला... आम्हाला लोकसभा महत्त्वाची आहे. त्यांनी (हर्षवर्धन पाटील) मला सांगितलं की, जे शक्य आहे, ते आम्ही करतो, पण तूर्त इकडंच आहोत", असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी इंदापुरात बोलताना केला.
"हर्षवर्धन पाटलांना मधून मधून फोन करायचो"
"मधून मधून मी फोन करायचो. शेवटी फोनवर ते बोलत नसल्याने मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली. तिथे भाषण केलं की, ज्यांना (अजित पवार) टाळून तुम्ही (हर्षवर्धन पाटील) तिकडे गेलात, तेच तुमच्याबरोबर तिकडे बसलेले आहेत. त्यामुळे सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचा विचार करा", असे जयंत पाटील भाषण करताना म्हणाले.
'दिल्लीश्वर पवारांना नमवण्याचे प्रयत्न करताहेत'
"मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर शरद पवारांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. २०१९ च्या निवडणुकीआधी शरद पवारांना ईडीची नोटीसही आली. पवारांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, अशी भावना या लोकांची होती. हा महाराष्ट्र मोडण्याचं काम काही लोक दहा वर्षांपासून दिल्लीत बसून करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा शरद पवारांच्या मागे उभी राहिली आहेत", अशी टीका जयंत पाटलांनी भाजपावर केली.