Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:43 PM2024-10-08T16:43:27+5:302024-10-08T16:46:43+5:30

Haryana Election Results 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिसऱ्यांदा काँग्रेसला धूळ चारली. हरयाणातील जनतेने भाजपाला जनादेश दिला, पण या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांचा पराभव झाला.

Haryana Results 2024: BJP wins Haryana elections, but loses five ministers; Who defeated? | Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?

Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?

BJP Ministers Defeated in Haryana election 2024: एक्झिट पोल आणि राजकीय अभ्यासकांचे अंदाज चुकवत भाजपाने तिसऱ्यांदा हरयाणात गुलाल उधळला. सुरूवातीला जोरदार मुंसडी मारलेल्या काँग्रेस नंतर पिछाडीवर गेली आणि मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर बहुमताच्या आकड्यापासून दूर गेली. दरम्यान, भाजपाने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलं असलं, तरी पाच मंत्र्यांचा पराभव झाला आहे. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता होती, कारण लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक होती; जिथे भाजपाच्या प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. काँग्रेसला या निवडणुकीच्या निकालाबद्दल आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, हरयाणाच्या निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला, तर भाजपाला बळ मिळाले. 

भाजपाच्या पाच मंत्र्यांचा पराभव

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पाच मंत्र्यांचा पराभव झाला. महत्त्वाचं म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, रणजीत चौटाला यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. 

नूंह विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री संजय सिंह पराभूत झाले. या मतदारसंघातून आफताब अहमद विजयी झाले आहेत. 

जगाधरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे मंत्री कंवरपाल गुर्जर यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेसचे अकरम खान यांनी त्यांचा पराभव केला. 

हिसार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. कमल गुप्ता यांचाही पराभव झाला. देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. 

त्याचबरोबर रानिया विधानसभा मतदारसंघात रंजित चौटाला यांचा, तर थानेसर विधानसभा मतदारसंघातून सुभाष सुधा हे मंत्रीही पराभूत झाले आहेत.

ज्ञानचंद गुप्तांचा कोणी केला पराभव?

पंचकुला विधानसभा मतदारसंघातून माजी विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांचे सुपुत्र चंद्रमोहन हे विजयी झाले. 

Web Title: Haryana Results 2024: BJP wins Haryana elections, but loses five ministers; Who defeated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.