Haryana Results 2024: हरयाणा विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. मतमोजणीच्या काही फेऱ्यांनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे. निवडणूक आयोग जाणीवपूर्वक सावकाश आकडेवारी अद्ययावत (अपडेट) करत आहे, त्यामुळे पारदर्शकतेबद्दल शंका येत आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्याचे दिसत आहे. सुरूवातीला कल काँग्रेसच्या बाजूने होते, पण भाजपने नंतर मुसंडी मारली. दुपारपर्यंतच्या कलानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. अचानक कल बदलल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाबद्दल शंका व्यक्त केली आहे.
जयराम रमेश काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना निवडणूक आयोगाकडून आकडे हळूहळू अपडेट केले जात असल्याचे म्हटले आहे.
"निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निवडणुकीचे कल जाणीवपूर्वक संथ गतीने सांगितले जात आहेत. त्यामुळे भाजपा प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका उपस्थित होत आहे", असे जयराम रमेश म्हणाले.
"ही प्रक्रिया मतदारांच्या अधिकाराचे हनन करणारी आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयवर परिणाम करणारी आहे. निवडणूक आयोगाने वेगाने आणि योग्य पद्धतीने निकालाची आकडेवारी जाहीर करावी, जेणेकरून जनतेचा विश्वास कायम राहील", असे जयराम रमेश म्हणाले.