कोल्हापूर : ज्याचा अनुभव नाही अशा आजाराशी राज्यातील महाविकास आघाडीपासून ते अगदी परिचारिका, ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वजण जीवाची बाजी लावून सामना करत असताना फसवी आंदोलने करणाऱ्या विरोधकांना लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपावर शनिवारी हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही. मात्र त्यांचे मुहूर्त चुकत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम गोळया वाटपाचा कोल्हापुरातून त्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने चालले आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आम्ही हे गोळ्या देण्याचे नियोजन केले. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी २३ रूपयांच्या गोळ्या २ रूपयांना देतो म्हणाले. पण आम्ही हे अधिकारी जिल्हा परिषदांना दिले. पाटील यांनी २ रूपयांना गोळ्या आणून द्याव्यात. विरोधकांनी जरा पीपीई किट घालून काम करून पहावे आणि जरा बिळातून बाहेर यावे. लोकशाही मध्ये आंदोलने हवीत. पण ही ती वेळ नाही.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, युपीए सरकारच्या काळात हेल्थ मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणले. त्याचे महत्व आता १० वर्षानंतर कोरोनाच्या काळात पटायला लागले आहे. आता जिल्हा परिषद सदस्यांनी घराबाहेर पडून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना बळ देण्याची गरज आहे. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचीही यावेळी भाषणे झाली.