नवी दिल्ली : सक्रिय राजकारणात प्रवेश केलेले अभिनेता कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या पक्षाला टॉर्च हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्याबद्दल कमल हसन यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले असून आम्ही वाट दाखविणाऱ्या मशालजीची (टॉर्चबेअरर) भूमिका बजावणार आहोत असेही त्यांनी सांगितले.तामिळनाडूतील लोकसभेच्या ३९ व पुडुचेरीमधील एक जागा लढविण्याचे एमएनएमने ठरविले आहे. त्यासाठी निवडणूक चिन्ह मिळण्याकरिता या पक्षाने निवडणूक आयोगाला फेब्रुवारीच्या मध्यास विनंती केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मदुराई येथे कमल हसन यांनी आपल्या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन देशातील विद्यमान राजकारणावर चर्चा केली होती. द्रमुकसोबतची युती तोडून काँग्रेसने एमएनएमसोबत यावे हा कमल हसन यांनी धरलेला आग्रह राहुल गांधी यांनी मान्य केला नाही. त्यानंतरच कमल हसन यांनी तामिळनाडू व पुडुचेरीमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र अजून एमएनएमने उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत.रजनीकांत यांच्या भूमिकेकडे लक्षकमल हसन यांच्याप्रमाणेच सुपरस्टार रजनीकांत यांनीही आपणही पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा डिसेंबर २०१७मध्ये केली होती. पण त्या दिशेने अद्याप त्यांनी काहीही हालचाल केलेली नाही. मात्र रजनीकांत यांच्या चाहत्यांनी स्थापन केलेले रजनी मक्कल मंदरम हे फॅन क्लब त्यांच्या नव्या पक्षात विलिन केले जातील अशी चर्चा आहे. रजनीकांत लोकसभा निवडणुका न लढविता राज्य विधानसभेच्या निवडणुकांवर सारे लक्ष केंद्रित करतील असेही म्हटले जाते.
हसन यांच्या एमएनएम पक्षाचे चिन्ह ‘टॉर्च’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:05 AM