नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावरूनच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सरकारला महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील असा सल्ला मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकसंदर्भात ट्विट केलं आहे.
"हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे 28 सप्टेंबर रोजी सर्वात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास भाग पाडलं" असं मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार हे सर्व अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील" असा सल्ला मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"
"योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. मायावती यांनी "केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" असं म्हटलं आहे.
"उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत"
"योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही इतरांच्या बहिणी-मुलींना आपली बहीण-मुलगी समजायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षणकरू शकत नाही तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं. तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत असा माझा 99 टक्के नाही तर 100 टक्के विश्वास आहे. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. हाथरस घटनेनंतर मला अशी आशा होती की दोषींवर उत्तर प्रदेश सरकार कारवाई करण्यासाठी पुढे येईल. मात्र असं काहीही झालेलं नाही. आज सकाळी मी बलरामपूरची आणखी एक घटना बातम्यांत पाहिली जी मला हादरवून टाकणारी होती. राज्यात बहिणी-मुली अजिबात सुरक्षित नाहीत. भाजपा सरकारच्या काळात गुंड, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे" असंही देखील मायावती यांनी म्हटलं आहे.