मुंबई – हाथरस बलात्कार प्रकरणानं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा होत नाही तोवर अशा घटनांना आळा बसणार नाही अशी जनभावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. हाथरस प्रकरणात पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणात मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या घटनेवर त्या म्हणाल्या की, पीडित तरुणीवर ज्यांनी अत्याचार केला, त्या प्रत्येक नराधमाला सात दिवसांच्या आत राजधानी दिल्लीतल्या 'इंडिया गेट'समोरच्या चौकात फाशी द्या. त्या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना दगडं मारण्याची परवानगी महिलांना द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच कळू दे या देशातल्या सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना, जात-धर्मापेक्षा एका महिलेच्या इज्जतीला या देशाचा कायदा अधिक महत्व देतो ते असंही शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. हाथरस बलात्काराने अनेकांच्या मनात चीड आणली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात त्यांनी बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी शरिरय कायदा असायला हवाच अस मत व्यक्त करताना दिसत आहेत.
घटनेबाबत महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर सवर्णांनी केलेल्या बलात्काराच्या भीषण घटनेची कसून चौकशी करण्यात यावी व दोषींना अत्यंत कठोर शिक्षा करावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुधवारी दिले आहेत. हाथरसमधील बलात्कार प्रकरणाबाबत मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात येईल. दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांनी तिची जीभ कापली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, या संघटनेचे दिल्ली विभागाचे प्रमुख हिमांशू वाल्मीकी हे हाथरसला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते व आता दोघेही बेपत्ता आहेत असा आरोप चंद्रशेखर आझाद यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा
एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे. विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नेपाळमधील एका तरुणाचे मुंडण केले होते. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच विश्व हिंदू सेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र अरुण पाठक हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.