मुंबई - महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची...रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की आणि अटक याचा निषेध केला आहे.
याबाबत जयंत पाटील म्हणाले की, हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे. भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक आहे. कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे...बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
नेमकं काय घडलं?
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत हाथरसला पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की, रस्त्यावर पडले; आंदोलनाला बसले
राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच "पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?, आमची गाडी थांबवण्यात आली म्हणूनच चालत निघालो होतो" असं देखील म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.