Hathras Gangrape :"स्मृती इराणी योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट द्यायला कधी जाणार?"
By बाळकृष्ण परब | Published: October 3, 2020 05:07 PM2020-10-03T17:07:55+5:302020-10-03T17:14:06+5:30
Hathras Gangrape news : भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तावित हाथरस दौऱ्यावर टीका केली होती.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारावरून संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहेत. तसेच या प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या हाथरस दौऱ्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. स्मृती इराणी योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट द्यायला कधी जाणार, एवढं सांगावं, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला आहे.
भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तावित हाथरस दौऱ्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांचा हाथरस दौरा हा न्यायासाठी नव्हे तर, राजकीय हेतूने प्रेरित आहे. जनतेला काँग्रेसचे हे हातखंडे माहित आहेत, त्यामुळेच २०१९ मध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळावा, हे जनतेने ठरवले होते, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या.
स्मृती इराणी यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. सुरजेवाला आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, स्मृती इराणी यांनी केवळ एवढंच सांगावं की, त्या योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट देण्यासाठी कधी जाणार आहेत.
तत्पूर्वी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को चाचणी करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावरही रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली होती. हाथरसरमधील पीडित कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय हा योगी आदित्यनाथ सरकारच्या वेडेपणाचा पुरावा आहे, पीडित तरुणीवर ना उपचार झाले. ना तिला न्याय मिळाला, रात्री अडीच वाजता पीडित तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना धमकी देण्यात आली. त्यांचा मोबाइलसुद्धा हिसकावून घेण्यात आला. गावात प्रसारमाध्यमांनाही जाऊ दिले नाही, अधर्मी योगींनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली होती.