नवी दिल्ली – हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यास बंदी घातली, यूपी पोलिसांनी मीडिया तसेच राजकीय शिष्टमंडळांनाही रोखलं. यावरुन चहुबाजूने टीका होत असताना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनीही योगी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उमा भारती यांनी एकामागोमाग एक ट्विट करुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागितला आहे.
उमा भारती म्हणाल्या की, तुम्ही अगदी स्वच्छ प्रतिमेचे राज्यकर्ते आहात. मीडियातील व्यक्ती आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांना या पीडित कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी द्या अशी विनंती आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल आहे. मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले.
तसेच राम मंदिराचा पायाभरणीही केली आहे. आम्ही रामराज्यावर दावा केला होता. "हाथरसची घटना मी पाहिली. पहिल्यांदा मला वाटले की यावर बोलू नये, कारण तुम्ही या संदर्भात तात्काळ कारवाई कराल असं मला वाटलं, परंतुपरंतु पोलिसांनी ज्या प्रकारे गावातील पीडित कुटुंबाला वेढा घातला आहे. त्यामुळे विविध शंका उद्भवतात. कुटूंबाने कोणालाही भेटू नये असा कोणताही नियम नाही "ती दलित कुटूंबची मुलगी होती. माझ्या माहितीनुसार एसआयटीमध्ये असा कोणताही नियम नाही. तपासणी दरम्यान कुटूंब कुणालाही भेटू शकत नाहीत असा टोलाही उमा भारतींना योगी सरकारला लगावला आहे.
हाथरस घटनेमुळे भाजपाच्या प्रतिमेला तडा गेला
आम्ही राम मंदिराचा पायाभरणी केली आहे. देशात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. परंतु या घटनेवर पोलिसांच्या संशयास्पद कारवाईने भाजपा आणि यूपी सरकारची प्रतिमेला तडा गेला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर नक्कीच त्या गावात गेले असते. मी तुमची मोठी बहिण आहे म्हणून विनंती करतेय मीडिया आणि राजकीय पक्षांना कुटुंबाची भेट घेऊ द्या असं उमा भारती म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले
राहुल गांधींना अटक व धक्काबुक्की
पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाललेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर अडवून ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून दिले. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना ढकलून देण्यात आले. ताफा अडवल्यानंतर हाथरसकडे पायी निघालेले काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापटही झाली. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसने निदर्शने केली आहे. योगी सरकार भरखास्त करा, आता भाजपा गप्प का? असा सवालही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हाथरसला निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, चेन्नई यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. राहुल गांधी पोलिसांना चुकवून हाथरसला जाण्याची योजना आखत असल्याचंही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता
हाथरस येथील बलात्कार पीडित दलित मुलीला उपचारांसाठी आम्ही दिल्लीतील एम्समध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. तिला सफदरजंग रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले हे माहित नाही असे अलिगढ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शाहिद अली यांनी म्हटलं आहे. अलिगढमधील या रुग्णालयात दलित मुलीवर दोन आठवडे उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून घेतली दखल
हाथरस प्रकरणाची अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून, याबाबत १२ ऑक्टोबरपर्यत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश राज्यातील गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि हाथरसच्या पोलिसांना दिले आहेत.
बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्ष
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.