Dhananjay Munde Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले नेते शरद पवारांच्या रडारवर आहेत. 'लोकमत'ला दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवारांनी जाहीरपणे धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंविरोधातपरळीत पवारांची काय रणनीती असणार, याबद्दल चर्चा होत असतानाच आता धनंजय मुंडेंनी पवारांवर हल्ला चढवला. 'माझे वैयक्तिक आणि राजकारणातील अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असे म्हणत धनंजय मुंडेंनी पवारांवर नाव घेता निशाणा साधला आहे.
परळीतील पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी बालगंधर्व रंगमंदिरात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडेंनी शरद पवारांना नामोल्लेख न करता लक्ष्य केले.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
"छोट्या पवारांची (अजित पवार) साथ दिल्यामुळे माझे व्यक्तिगत आणि सामाजिक राजकारणातील अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते आणखी प्रयत्न करत राहतील. पण, जनतेने माझ्यासोबत राहावे. मग बाकीच्या गोष्टी मी पाहून घेईन", असे धनंजय मुंडे शरद पवारांचं नाव न घेता म्हणाले.
"मी काही कारणास्तव बाजूला गेलो, तर माझे अख्खे राजकारण संपवले जात आहे. मी कधी कोणाची जात काढली नाही. पण, माझ्यामुळे काहीजण आज जात काढत आहेत. मी कोणाला कधीच घाबरत नाही. कारण जनतेसाठी माझे काम प्रामाणिक आहे. ज्यांनी अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ", असे म्हणत धनंजय मुंडेंनी दंड थोपटले.
कोणाशी टोकाचे वैर नाही -धनंजय मुंडे
"माझी इच्छा होती की, वकील व्हावे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलो. राज्यभरातील मित्र माझे याठिकाणी जाले. जीवनात कधी जातपात, धर्म, पंथ मला शिवले नाही. राजकारणात कधी कोणाशी टोकाचे वैर झाले नाही मी किंवा माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे राजकारणात येऊन मोठे व्हावे ही इच्छा ठेवली नाही. मुंडे साहेबांसाठी मी राजकारणात आलो, ते माझ्यासाठी मिशन आहे", अशा असे धनंजय मुंडे म्हणाले.
"प्रत्येकजण राजकारणात यशस्वी होईल, ज्यावेळी राजकारण समाजसेवेसाठी करेल. आमचे संघर्षाचे राजकारण आहे. जनतेचे जोपर्यंत प्रेम माझ्यासोबत आहे, तोपर्यंत माझ्या घराबद्दल, जातीबद्दल काढले तरी काही होऊ शकत नाही", असे म्हणत धनंजय मुंडेंनी राजकीय विरोधकांना उत्तर दिले.
मुंडेंसमोर पवार आणि जरांगेंचं आव्हान?
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार अशा नेत्यांच्या मतदारसंघात सातत्याने दौरे करत असून, यात धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवारांचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला, तरी एकीकडे मनोज जरांगे आणि दुसरीकडे शरद पवारांची खेळी यामुळे धनंजय मुंडेंसमोर दुहेरी आव्हान असणार अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील मतदारांना अशीच लढाई बघायला मिळाली होती.