यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २४५ कोरोना योद्ध्यांचे बळी गेले. यातील केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित २३६ कुटुंबांना मदतीसाठी आणखी ११८ कोटी रुपयांची गरज आहे. या निधीसाठी परिवहन मंत्र्यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे घातले. आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी निधीचा हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे.
राज्यभरातील नऊ हजार एसटी कर्मचाऱ्यांना काेराेना झाला. पैकी २४५ जणांचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच महामंडळाने प्रदान केले. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला विम्याची मदत देण्यासाठी पैसे नाहीत, ही वास्तविकता आहे.मृत फक्त नऊ जणांच्या कुटुंबांना मदत मिळाली. दोन कुटुंबांना मदतीचे प्रस्ताव तयार झाले, प्रत्यक्षात मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याचे समाेर आले आहे. मृतांच्या कुटुंबास मदत देण्यास हातभार लावावा, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना केली आहे. परंतु, अद्याप विभागाने यावर काेणतेही उत्तर दिले नसल्याचे समजते.
...त्यामुळेच ३५ कोटी सांभाळून ठेवले प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे एक रुपया कपात केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूस एसटी जबाबदार असल्यास दहा लाखांची भरपाई यातून दिली जाते. त्यामुळे शिल्लक असलेले ३५ कोटी रुपये सांभाळून ठेवले जात आहेत. परिवहन मंत्र्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी सूचना केल्यास एसटी महामंडळाला मदतीचा हात देता येईल.- विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री