नवी दिल्ली : सलग दोन लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर पहिल्यांदा पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून सर्व स्तरावर पक्ष-संघटनेत अमुलाग्र बदलांची मागणी केली आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज आहे, अशा शब्दात या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष आपला जनाधार गमावतो आहे, याशिवाय युवकांचा विश्वास संपादन करण्यासही पक्ष कमी पडतो आहे, असे या नेत्यांनी पत्रात म्हटले आहे. पत्रामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्त्वबदलाची चाहूल लागली असून नवा अध्यक्ष कोण याचीही चर्चा रंगली आहे. पूर्णवेळ नेतृत्त्व या शब्दाभोवती हे पत्र फिरत असून लोकांमध्ये मिसळून नव्या नेतृत्त्वाने काम करावे अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल या दिग्गजांचा पत्र लिहिणा?्यांमध्ये समावेश आहे.
भाजप विरोधी पक्षांशी समन्वय व काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यात यावे, असेही या नेत्यांनी सुचवले आहे. तसे झाल्यास कांग्रेस सोडून गेलेले दिग्गज नेत्यांना पुन्हा परतण्यासाठी कोणते पद द्यावे याचा उल्लेख नेत्यांनी टाळला आहे. पक्ष नेतृत्वाने पूर्णवेळ संघटनेसाठी द्यावा, त्यासाठी लोकांमध्ये मिसळणे गरजेचे आहे, असे या नेत्यांनी पत्रात म्हटले असले तरी गांधी -नेहरू कुटुंबाचे योगदानही अधोरेखित केले आहे. लोकशाही संवर्धनासाठी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त मजबूत होणे गरजेचे आहे. देशासमोर अंतर्गत व बाह्य आव्हाने आहेत. राजकीय, आर्थिक व सामाजिक संकटे दिसत असताना काँग्रेस पक्ष मात्र काहीसा कमकुवत भासतो, असा सूर या पत्रातून उमटला आहे. लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले पण पक्षाने एकदाही स्व-परिक्षण केले नाही. तेही व्हावे, संघटनात्मक बदल दीर्घकाळासाठी असावेत. पक्षांतगर्त निवडणूक घेण्यात यावी असे या पत्रात नेत्यांनी म्हटले आहे.या नेत्यांचा लेटरबाँम्बराज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर, काँग्रेस कार्य समिती सदस्य मुकुल वासनिक, जतीन प्रसाद, खासदार विवेक तनखा, माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंह हूडा, पृथ्वीराज चव्हाण, वीरप्पा मोईली, पी.जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी मिलंद देवरा, माजी प्रदेश अध्यक्ष राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंह, कलदीप शर्मा, योगानंद शास्त्री व संदीप दीक्षितपत्रातून या नेत्यांनी सुचवलेत अनेक बदल
- ज्यामध्ये विविध राज्यांमधील, संघटनांमधील नियुक्त्या तात्काळ कराव्यात.
- त्यातील गटबाजी टाळण्यात यावी.
- जनाधार असलेल्या नेत्यांना राज्यात सक्षम करावे.
- युवक काँग्रेस व एनएसयुआय या दोन्ही संघटना केडर पुरवणाऱ्या असल्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती-निवडणुकीत संतुलन राखावे.
- पक्षाला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज असून काँग्रेस कार्य समितीची निवडणूक घेण्यात यावी.
- देशात धर्मांध विचारांचा प्रभाव वाढत असल्याने पक्षविस्तार गरजेचा, संघटनात्मक नियुक्तीसाठी निवडणूक व्हायला हवी.
- राज्य काँग्रेस कार्यकारिणीला जास्तीत जास्त अधिकार द्यावे त्यामुळे स्थानिक ठिकाणी संघटना मजबूत होईल, या प्रमुख मुद्यांचा समावेश आहे.