गुवाहाटी - एक २२ वर्षांचा तरुण आणि केवळ १७ वर्षांची तरुणी प्रेमाच्या आणाभाका घेत होते. तेव्हा या तरुणीने या तरुणाला विचारले की तुझ्या भविष्यातील करिअरबाबत आईला काय सांगू. तेव्हा तो तरुण म्हणाला की, तुझ्या आईला सांग, मी एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री बनेन. हा कुठला फिल्मी डायलॉग नाही तर वास्तव आहे. आज आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या हिमंत बिस्वा सरमा यांनी अनेक वर्षांपूर्वी पत्नीला प्रपोज करताना आपले भविष्यातील इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अखेर ३० वर्षांनी त्यांचे म्हणणे खरे झाले आहे.
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा हिंमंत बिस्वा सरमा हे कॉटन कॉलेजचे विद्यार्थी होते. तेव्हा सरमा यांच्या आताच्या पत्नी आणि तेव्हाच्या प्रेयसी असलेल्या रिनिकी भुयन यांना लग्नासाठी मागणी घालताना हे उदगार काढले होते. रिनिकी भुयन सांगतात हिमत हे विद्यार्थीदशेपासूनच मुख्यमंत्री बनण्याबाबत निश्चिंत होते. त्यांनी विद्यार्थी जीवनातच आपले लक्ष्य निश्चित केले होते. भविष्यात काय करायचे, कोण बनायचे हे त्यांनी निश्चित करून टाकले होते. अखेर आज त्यांनी आसामचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
रिनिकी यांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा हिमंत २२ आणि मी १७ वर्षांचे होते. तेव्हा मी त्यांना विचारले होते की मी माझ्या आईला तुमच्या भविष्याबाबत काय सांगू, तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, त्यांना सांग मी आसामचा मुख्यमंत्री बनेन. त्यांचे ते उदगार ऐकून मला धक्का बसला. मात्र नंतर मला जाणवले की, मी ज्या व्यक्तीसोबत विवाह करतेय त्यांचे राज्याबाबत एक निश्चित लक्ष्य आणि स्वप्न आहे. तसेच ते पूर्ण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.
रिनिकी म्हणतात, जेव्हा आमचा विवाह झाला. तेव्हा ते आमदार होते. त्यानंतर ते मंत्री बनले. त्यानंतर त्यांची राजकीय प्रगती होत राहिली. मात्र आज त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहून काही काळ माझा विश्वासच बसला नाही. आज ते मुख्यमंत्री झाले असले तरी माझ्यासाठी ते नेहमीच हिमंत राहिले आहेत.