वसई- बहुजन महापार्टीनं बहुजन विकास आघाडीशी असलेली युती तोडल्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिट्टी या चिन्हावरच वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु शिट्टी हे निवडणूक चिन्ह बहुजन महापार्टीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असल्याचं गॅझेट प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. शिट्टी या चिन्हावरच बविआनं वसई-विरार महापालिकेत सत्ता काबीज केली आहे. शिट्टी या निवडणूक चिन्हावरूनच बविआचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे पालघरमध्ये बविआ आता कोणत्या चिन्हावर उमेदवार देते हे येत्या काळात समजणार आहे.तर दुसरीकडे बहुजन महापार्टी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिट्टी या चिन्हावर उमेदवार उभे करणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीशी असलेली आघाडी संपुष्टात आली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी दिली होती. बहुजन महापार्टी हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान या आहेत. बहुजन महापार्टी ही महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडी बरोबर निवडणुकीत स्थानिक पातळीवर आजवर आघाडी करत आलेली आहे.महाराष्ट्रातील पक्षाच्या कोर कमिटीने लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन बहुजन विकास आघाडी बरोबर पालघर लोकसभा मतदासंघात स्थानिक पातळीवर आघाडी जाहीर केली होती. मात्र राष्ट्रीय कोअर कमिटीला स्थानिक पातळीवर आघाडी मान्य नसल्याने राष्ट्रीय अध्यक्ष तसलीमुन्नीसा खान यांनी मला 29 मार्च रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती, अशी माहिती बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी दिली.
बहुजन विकास आघाडी अडचणीत, 'शिट्टी' निवडणूक चिन्हावर बहुजन महापार्टीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 5:33 PM