नवी दिल्ली: चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाची स्थापना करणाऱ्या कमल हासन यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठी घोषणा केली आहे. कमल हासन यांच्या पक्षाचा जाहीरनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना दर महिन्याला पगार देऊ, अशी घोषणा हासन यांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे.तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी कमल हासन यांनी प्रचार सुरू केला आहे. पक्ष सत्तेत आल्यास कोणकोणत्या योजना राबवल्या जातील, याची माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 'शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्यात येईल. गृहिणींकडे अनेकदा समाजाचं दुर्लक्ष होतं. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मासिक वेतन देईल. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढेल. यासाठी पक्ष सुशासन आणि आर्थिक विषयांसंदर्भात सात कलमी कार्यक्रम राबवेल,' असं कमल हासन म्हणाले.
सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: January 05, 2021 7:05 PM