केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी लोकसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही उत्तर देत विरोधकांना धारेवर धरलं. "या ठिकाणी विचारण्यात आलं की कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केलं याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती. ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की आपण हिशोब मागण्याच्या लायक आहोत का?," असं म्हणत शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ हे पारित करण्यात आलं.
"काश्मीरमध्ये आतापर्यंत तीन कुटुंबांचचं शासन होतं आणि यासाठी कलम ३७० हटवण्यावर त्रास होत आहे. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राजची स्थापना केली. निवडणुकांमध्ये घोटाळा झाला याचा आरोप कोणीही करू शकत नाही. जम्मू काश्मीरमध्ये सर्व अधिकारी हे भारतमातेचेच सुपुत्र आहेत. राजा राणीच्या पोटी जन्म घेणार नाही तर मतांमधून घेईल," असंही शाह यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चं जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं.