मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन गेल्या ३ महिन्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष सुरु आहे. १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळला, सुरुवातीला सुशांतने आत्महत्या केल्याचं बोललं गेलं परंतु त्यानंतर सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता, या तपासात मुंबई पोलिसांवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये मुलाच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंदवला. यानंतर संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात थेट आदित्य ठाकरेंचे नाव जोडले गेले. राजकीय दबावापोटी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास संथगतीने सुरु असल्याचा आरोप झाला. त्याचसोबत ठाकरे सरकार कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय असंही बोललं गेलं.
सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र गेल्या दीड महिन्यापासून तपासात कोणतीही हालचाल दिसत नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस प्रोफेशनल पद्धतीने आणि चांगल्यारितीने करत होती, त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्हीही उत्सुक आहोत, सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा संभ्रम लोकांमध्ये आहे असा चिमटा त्यांनी काढला.
तसेच सीबीआयच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहतोय, हा तपास दीड महिना झाला सीबीआयकडे आहे त्यामुळे तपास कुठपर्यंत आला याची आम्हाला उत्कंठा आहे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुखांनी विरोधकांना नाव न घेता लगावला आहे. यावर सीबीआयने प्रेस नोट काढून उत्तर दिलं आहे. सीबीआयनं सांगितलं आहे की, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सीबीआय प्रोफेशनली तपास करत आहे. या प्रकरणातील सर्व बाबींकडे पाहिले जात आहे आणि आजपर्यंत कोणतीही गोष्ट बाहेर आली नाही, तपास सुरु आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेची नाहक बदनामी झाली त्याची भरपाई कोण देणार?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार? असा सवालही शिवसेना मंत्री अनिल परब यांनी विचारत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.