- किरण अग्रवाल
क्षमतांचा विचार न करता रान पेटवून देण्याला राजकारणात वेगळे महत्त्व असते, नाही काही तर त्यातून स्वकीयांना असो की इतरांना; काही संकेत नक्कीच देता येतात व जमलेच तर तकलादू खुंटे बळकट करून घेता येतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पश्चिम वऱ्हाडचा दौरा करून जागोजागी स्वबळावर लढण्याच्या तयारीची जी भाषा केली त्याकडेही याच संदर्भाने बघता यावे.
नानाभाऊ पटोले तसे अघळपघळ स्वभावाचे, मनात येईल ते हातचे न राखता मोकळेपणे बोलून जाणारे; त्यामुळे अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील दौऱ्यात पक्ष संघटनेच्या बांधणीबाबत मार्गदर्शन करताना आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाही ते व्यक्त करून गेलेत. नानाभाऊंनी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याच्या केलेल्या आवाहनापासून ते मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या इच्छेपर्यंत, आता राज्यभर गहजब सुरू आहे. विरोधकांबरोबरच राज्याच्या महाआघाडीतील सहकाऱ्यांनीही नानाभाऊंना सल्ले देणे सुरू केले आहेे; पण नानाभाऊंनी एक पाऊल पुढे टाकत राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यात संकल्प दिन पाळला. आत्मविश्वास व त्याच्या जोडीला मेहनत करण्याची त्यांची तयारी यातून दिसून यावी.
नानाभाऊंच्या स्वबळाच्या भाषेवरून राज्यात काँग्रेसचे बळ किती, असा प्रश्न सर्वत्र केला जाणे स्वाभाविकही आहे; तसे पश्चिम वऱ्हाडातला विचार केला तर येथेही ते जेमतेमच आढळते. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकेक आमदार वगळता काही नाही. म्हणायला बुलडाणा जिल्ह्यात संघटनात्मक स्थिती त्यातल्या त्यात बरी आहे; पण इतर ठिकाणी आंदोलन करायचे तर कार्यकर्त्यांची वानवा जाणवते ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक ठिकाणी गटबाजीने काँग्रेसला पोखरून ठेवले आहे. यंदा राज्यातील सत्तेचा वनवास संपला; पण पश्चिम वऱ्हाडातील कोणाच्या नशिबी सत्तेचा काय वाटा आला याचे उत्तर समाधानकारक देता येत नाही. पक्ष वाढणार कसा, हा प्रश्न त्यातूनच उपस्थित होतो. स्वबळाची तयारी करायला अजिबात हरकत नाही, पण बळ एकवटायचे कशाच्या आधारावर?
काँग्रेसला स्वबळ आजमावायचे तर भाजपबरोबरच महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीशी सामना करावा लागेल, त्यात वंचित बहुजन आघाडीचाही महत्त्वाचा फॅक्टर असेल. पश्चिम वऱ्हाडात भाजपकडे संजय धोत्रे यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिपदासह अकोला महापालिका व सर्वाधिक आमदारांचे बळ आहे. बहुतांश नगरपालिकाही ताब्यात आहेत. स्वकीयांच्याच दृष्टीने विचार करायचा तर राष्ट्रवादीने बुलडाणा जिल्ह्यातून राजेंद्र शिंगणे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार नाही, मात्र तेथील पक्षसंघटन चांगले आहे. अकोल्यात अमोल मिटकरी यांना विधान परिषदेत संधी देऊन संघटना बांधणीचे संकेत दिले आहेत, शिवाय मातब्बर नेते राष्ट्रवादीकडे आहेत; या तुलनेत काँग्रेस मात्र विकलांग अवस्थेत दिसते. अशा स्थितीत राष्ट्रवादीशी लढायचे तर ते वाटते तितके सोपे नाही.
शिवसेनेकडेही वाशिम व बुलडाण्यातली खासदारकी आहे. बुलडाण्यातील दोघा आमदारांचा चांगला प्रभाव आहे, अकोल्यातील एका आमदारकीखेरीज विधान परिषदेतील गोपीकिशन बाजोरिया यांना आता प्रतोद म्हणून नेमण्यात आल्याने त्या बळाचा पक्ष संघटनेसाठी उपयोग होऊ शकेल. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहेच, विविध पंचायत समित्यांमध्येही अस्तित्व राखून असताना एकूणच राजकारणात ते निर्णायक भूमिकेत आहेत. तेव्हा काँग्रेसचा एकेरी मार्ग निर्धोक नाहीच. कशाला, या पक्षाला तसेही विरोधकांची फारशी गरज नसते. स्वकीयच आडवे जाण्यात कसूर ठेवत नाहीत, त्यामुळे घरातले खुंटे बळकट होणेही गरजेचेच आहेत.
सारांशात, कोणालाही सहज घेता येऊ नये किंवा कोणाचीही उणीव भरून काढता येऊ नये अशा या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला स्वबळाची तयारी करायची म्हणजे खूपच यातायात करावी लागेल. भविष्यात ती घडून येईल न येईल; पण नानाभाऊंची इच्छा बघता कार्यकर्ते कामाला लागलेत तरी पुरे.
नाना पटोले केवळ स्वबळाची भाषा करून थांबलेले नाहीत तर त्यांनी प्रतिकूल स्थितीतही काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू करून दिले आहे. अमरावतीचे मातब्बर नेते डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाकडे त्यासंदर्भात बघता येणारे असून, सहयोगी पक्षातही त्यामुळे चलबिचल होणे स्वाभाविक ठरावे. उक्तीला कृतीची जोड देताना पटोले यांनी लगेचच संकल्प दिनही साजरा करीत या संकल्पास सिद्धीकडे नेण्याचा प्रवास सुरू करून दिला आहे. राज्याच्या सत्तेत असूनही स्थानिक पातळीवर आलेली पक्षातील सुस्तावस्था यामुळे झटकली जाण्याची अपेक्षा आहे.