शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बंडाचे रागरंग दाखवणारे नेते सोमवारी वाईटरीत्या फक्त वेगळेच पडले, असे नाही तर ते वारंवार आपल्या पत्राबद्दल स्पष्टीकरण करत होते.
कार्यकारिणी समितीच्या वरिष्ठ सदस्य अंबिका सोनी यांनी ज्या नेत्यांनी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्या सगळ््यांवर कारवाईची मागणी केली. या नेत्यांनी फक्त सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेच नाही तर प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचण्याचीही व्यवस्था केली, असे म्हणताना अंबिका सोनी यांना अश्रू आवरले नाहीत. त्या म्हणाल्या, ‘‘माझी प्रकृती बरी नसताना मी येथे बैठकीला आले व ही माझी शेवटची कार्यकारिणी समितीची बैठक आहे.’’
अंबिका सोनी यांनी केलेल्या या हल्ल्याने त्रासलेले मुकुल वासनिक, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा बचावात्मक पवित्र्यात आले व त्यांनी खुलासा केला की, ‘‘आम्ही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याविरोधात काहीही बोललेलो नाही की पत्र बाहेर जाऊ दिले.’’ पत्र लिहिणारे चौथे सदस्य जितीन प्रसाद यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची क्षमा मागताना आपले वडील जितेंद्र प्रसाद यांचा हवाला दिला. ते म्हणाले की, ‘‘त्यांनी अनेक वर्षे गांधी कुटुंबाला साथ दिली मग मी कसा गांधी कुटुंबापासून वेगळा होऊ शकतो? माझा पूर्ण विश्वास सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आहे आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद घ्यावे, असे मला वाटते.’’
नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून जे वादळ पक्षात निर्माण झाले ते शांत करण्यात मनमोहन सिंग आणि ए. के. अँटोनी यांची महत्त्वाची भूमिका होती. बैठक सुरूहोताच २३ नेत्यांच्या पत्रावरून मनमोहन सिंग यांनी टिप्पणी की, ते पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत जाणे फारच दु:खद आहे. यामुळे काँग्रेसचे खूप नुकसान होईल. अंतरीम अध्यक्ष म्हणून न राहण्याची भूमिका न सोडणाऱ्या सोनिया गांधी यांची त्यांनी समजूत काढली. पक्ष जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडत नाही तोपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून राहण्यास गांधींना त्यांनी तयार केले. अँटोनी यांचे म्हणणे होते की, ते एक क्रूर पत्र असून ते सहन केले जाऊ शकत नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी असे मुद्दे घेऊन जाणे ही काँग्रेसची परंपरा नाही.
या दरम्यान पी. चिदंबरम यांनी युक्तिवाद केला की, ‘‘सोनिया गांधी यांना काँग्रेस अधिवेशन होईपर्यंत अध्यक्ष पदावर राहू देणे आपण सगळ््यांची जबाबदारी आहे. काही महिन्यांत कोरोनावरील लस येईल तेव्हा आम्ही महाअधिवेशन बोलावून नवा अध्यक्षाची निवड करू शकतो.’’ यावर राहुल गांधी म्हणाले की, ‘‘फेब्रुवारीपर्यंत कोणतीही लस येणार नाही. आम्हाला कोरोनाला तोंड द्यावे लागेल.’’ त्यावर चिदंबरम यांची सूचना होती की, पक्षाचे महाअधिवेशन व्हर्च्युअल बोलावले जावे. ही सूचना सोनिया गांधी यांनी फेटाळून लावताना म्हटले की, परंपरेनुसार महाअधिवेशन आयोजित केले जावे. राहुल यांची सूचना होती की, जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी दोन - चार लोकांना नियुक्त केले जावे.
अहमद पटेल बैठकीत सगळ््यात कमी बोलले. ते म्हणाले, ‘‘जे काही व्हायचे ते घराच्या चार भिंतीत. घराबाहेर होऊ नये. पत्राची प्रत बाहेर गेलीच कशी?’’ त्यावर गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘‘मी या पत्राची कोणतीही प्रतिलिपी बनवली नव्हती.’’ त्यावर रणदीप सुरजेवाला यांनी हल्ला केला की, ‘‘संजय झा यांचे भाष्य मग कसे आले?’’ या दरम्यान, के. सी. वेणुगोपाल उठून बाहेर जाताना पडद्यावरदिसले.काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी बैठकी दरम्यान बरेच उग्र आणि चिंतित दिसले. ते म्हणाले, ‘‘माझी आई रुग्णालयात होती आणि पक्षाचे नेते त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्यांनी पक्षासाठी एवढी वर्षे जे काही केले त्यानंतरही त्यांच्याकडे बोट दाखवणे किती योग्य आहे?’’ राहुल यांचे थेट लक्ष्य होते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा.आझाद यांनी असा खुलासा केला की, ‘‘आमचा हेतू सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या दिशेने बोट उचलण्याचा नव्हता. आमची तर इच्छा आहे की, राहुल गांधी यांनी नेतृत्वपद सांभाळावे आणि मोदी- शहा यांच्याविरोधात आघाडी उघडावी.’’ आझाद तर असेही म्हणाले की, ‘‘आमच्यावर आरोप करू नका. सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत व राहतीलही.’’ आनंद शर्मा यांनी आपल्या पत्राला योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु चारही दिशांनी होत असलेला हल्ला पाहून त्यांनी तात्काळ भूमिका बदलली व म्हटले की, ‘‘राहुल गांधी हेच अध्यक्ष असावेत, असे आम्हाला वाटते.’’