Corona Vaccine:...मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?; काँग्रेसकडून टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 11:15 AM2021-04-20T11:15:54+5:302021-04-20T11:17:29+5:30
Congress Asked questions over given vaccine to Tanmay Fadnavis: कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते
मुंबई – राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण होत असताना दुसरीकडे कोरोना लशीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियात टाकल्यानंतर काँग्रेसने भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे.
कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते. मात्र तन्मय फडणवीस यांना कोरोना लस दिल्याचा फोटो व्हायरल झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
याबाबत काँग्रेसने ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं म्हटलंय की, ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच तन्मय फडणवीस ४५ वर्षापेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने विचारली आहे.
कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू झाल्यापासून अनेक जण सोशल मीडियात लस घेतलेल्याचे फोटो टाकतात. तन्मय फडणवीस यानेही इन्स्टाग्राम खात्यावर त्याचे लस घेतलेल्या फोटो टाकले होते. परंतु हा फोटो व्हायरल झाला आणि देवेंद्र फडणवीस गोत्यात आले. त्यानंतर तातडीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा फोटो डिलीट करण्यात आला मात्र तोपर्यंत सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला होता. सत्ताधारी पक्षांना भाजपावर कुरघोडी करण्याची आयती संधीच सापडली. तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.