गरिबी हटवणार हे सांगायची लाज कशी वाटत नाही? मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:46 AM2019-04-23T05:46:51+5:302019-04-23T05:47:41+5:30
पुन्हा गरिबी हटवण्याचा नारा द्यायची राहुल यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कल्याण : गेली ६० वर्षे देशाच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबी हटवण्याचा नारा दिला आहे. त्यांचे पणजोबा, आजी, वडील आणि आई सत्तेत होते, तेव्हा गरिबी हटली नाही. आता पुन्हा गरिबी हटवण्याचा नारा द्यायची राहुल यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ फडके मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सध्या वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातींमध्ये ‘पुन्हा मते मागायला या सरकारला लाज कशी वाटत नाही’, अशी ओळ वापरली आहे. तोच धागा पकडून फडणवीस यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. सभेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, महापौर विनीता राणे, भाजप नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, गरिबी हटवू, असे राहुल गांधी प्रत्येक सभेत सांगत आहेत. त्याविषयी त्यांनी चिदंबरम यांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी गेल्या दोन वर्षांत सरकारच्या तिजोरीत पैसा आला आहे. त्यातून गरिबी हटवू, असे सांगितले. याचा अर्थ मोदींनी आणलेला काळा पैसा वापरून काँग्रेस गरिबी हटवण्याचे दावे करत आहे. हा आयत्या बिळावर नागोबा, असून काँग्रेसचा नारा हास्यास्पद आहे.
फडणवीस म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची निम्मी भाषणे मोदींना शिव्या देण्यावर खर्च होत आहेत. त्यात विकासाचे मुद्देच नसतात. मोदींचा या मंडळींनी इतका धसका घेतला आहे की, झोपेतून ते दचकून जागे होतात. टीव्ही मालिका सुरू होण्यापूर्वी सूचना दिली जाते की, या मालिकेतील घटनेचा कोणत्याही जिवंत व मृत व्यक्तीशी काही संबंध नाही. ही घटना काल्पनिक आहे. संबंध आला तर तो योगायोग समजावा. राहुल यांच्या भाषणांचाही वास्तवाशी काही संबंध नाही. ते केवळ हवेतील आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणापूर्वी चॅनलवाले अशीच सूचना प्रसारित करू शकतात, असे फडणवीस म्हणाले. ‘चौकीदार चोर है’ असे विधान गांधी यांनी केले. त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली असता त्यांनी न्यायालयास लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हे विधान आपण उत्साहाच्या भरात केल्याचे म्हटले आहे. माझ्याकडून चुकून हे विधान केले गेले आहे. दुसºयाकडून स्क्रीप्ट घेतल्यावर अशी माफी मागण्याची वेळ येते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
५६ पक्षांना एकत्रित घेऊन सत्तापरिवर्तन करता येत नाही. त्यासाठी ५६ इंचांची छाती लागते. ती छाती केवळ मोदी यांच्याकडे आहे. ही निवडणूक म्हणजे अनाचारी, दुराचारी पक्षांच्या विरोधात देशभक्तीचा महायज्ञ आहे. देशभक्तीचा महायज्ञ केवळ मोदीच करत आहेत. हा देश मोदी यांच्यासोबत आहे, असा विश्वास व्यक्त करत मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कपिल पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळला
आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव घेणे व त्यांच्यावर टीका करणे टाळले. मात्र, सभा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडजवळील फडके मैदानावर असल्याने डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाच्या प्रत्येक कणावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प राबवण्याची हमी दिली. त्याचबरोबर मेट्रो रेल्वेमुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, तळोजा, नवी मुंबई, ठाणे असा धक्केमुक्त गारेगार प्रवास करता येणार आहे. रिंग रोडचा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
करंजुले पितापुत्राचा भाजपप्रवेश
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गुलाब करंजुले व त्यांचे चिरंजीव अभिजित करंजुले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
रामदास आठवले यांनी आपल्या कवितेत नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे अपिल, निवडून येणार कपिल, अशी कविता सादर केली. त्यामध्ये कपिल पाटील नाहीत हावरे, तर निवडून कसे येतील टावरे, असे यमक जुळवल्याने त्याला दाद मिळाली.