मुंबई : महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचा कथित आदेश, बदल्यांचे रॅकेट आदींसह महाविकास आघाडी सरकारवरील १०० आरोपांची यादी भाजपच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली आणि राज्यपालांनी याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवावा, अशी मागणी केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यातील अस्थिर परिस्थिती, शासनाकडून प्रशासनाला देण्यात येत असलेले चुकीचे निर्देश, कोरोना रोखण्यात आलेले अपयश, गृहमंत्र्यांनीच वसुलीचे टार्गेट देणे, बदल्यांचे रॅकेट, जनहिताची कामे करण्यात सरकारला येत असलेले अपयश आदी मुद्द्यांवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि दबावाखाली असलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
काँग्रेसला किती वाटा?सरकारवर गंभीर आरोप होत असताना काँग्रेसने मौन का बाळगले आहे? त्यांना किती वाटा मिळतो, हे त्यांनी सांगावे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मौनही खटकणारे आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.