केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही, असे सांगितले. तसेच सहकारी पक्षांसोबत बोलून, मुख्यमंत्र्यासोबत बोलून काय ते ठरेल पण अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित काही योजना आहेत, असेही ते सांगण्यास विसरले नाहीत. (Ajit Pawar talk on State budget, Amit Shah, Adani-sharad pawar meet.)
अजून ही बाजारातील अनेक सेवांना ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद नाही. हळू हळू भीती कमी होईल, त्यानंतर बाजारात तेजी येईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशाही पवारांनी व्यक्त केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारला ते परवडणारे नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी सुरुवातीला तशी घोषणा केली, परंतू नंतर त्याबाबत वेगवेगळी संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केल्याचा आरोप पवारांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याच्या वृत्ताचे अजित पवारांनी खंडन केले. आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतो. ग्राम पंचायत निवडणुकीत आम्ही भाजप पेक्षा बरेच पुढे राहिलो. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा दावाही पवारांनी केला.
कोणतेही वक्तव्य करताना मंत्र्यांनी आर्थिक भार पडणार आहे, त्याचा अंदाज घेऊन बोलावे, अशी अपेक्षा असते.. कारण केलेली घोषणा तिजोरी पेलू शकणार का हे महत्वाचे आहे, असे वीज बिल माफीच्या घोषणेवर पवारांनी सांगितले. तसेच कोणत्याही मंत्र्याने शहानिशा न करता घोषणा केली असे मी म्हणणार नाही, परंतू त्या जागी अजित पवार जरी असला तरीही अंदाज घेऊन बोलले पाहिजे, असा सल्ला त्यांनी सहकारी मंत्र्यांना दिला.
सरकारला कुठलाही धोका नाहीजेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हा पासून तारखा सांगितल्या जातात. मात्र, तसे काही घडलेले नाही. जोवर या सरकारला तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे, तोवर हे सरकार अस्थिर होणार नाही. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना अनेक लोक भेटत राहतात. त्यामुळे अदानी त्यांना भेटले म्हणून काही घडलं असे नाही, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांचे नाव न घेता पवारांनी दिले आहे. अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या दगाबाजीच्या आरोपावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला ऊत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दारा आड काय घडले हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे ते म्हणाले.
एल्गार परिषदशरजिलने जे वक्तव्य केले ते चूकच आहे. त्याने तसे वक्तव्य करायला नको होते. आणि तेव्हा जे स्टेज वर होते, त्यांनी ही त्याला थांबवायला पाहिजे होते. आता गुन्हा दाखल झाला आहे, निश्चित कारवाई होईल. यापुढे परवानगी देताना सरकार म्हणून आम्ही विचार करू की या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे समाजात दुही निर्माण होते म्हणून त्याला बोलू देता कामा नये, असेही पवारांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनात बसले आहेत. 15 वेळेला चर्चा होऊन ही निर्णय लागत नाही. म्हणजे चर्चा करणाऱ्यांना निर्णय घ्यायचाच नाही का अशी शंका येतेय. सुप्रिया सुळे भेटायला गेल्या तेव्हा अडथडे आणले. खासदारालाही भेटू देत नाही. खिळे लावता आणि मग थोड्या वेळाने काढून घेता. म्हणजे सरकारच्या मनात काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित करत शेतकरी विरोधी भूमिकेचे सरकार असल्याचा आरोप पवारांनी केला.