“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"
By प्रविण मरगळे | Published: September 23, 2020 01:49 PM2020-09-23T13:49:36+5:302020-09-23T13:52:13+5:30
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. मुंबई हायकोर्टात कंगनानं संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली, त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे. कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर बीएमसीने हातोडा मारला म्हणून कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात तिने संजय राऊत यांच्या धमकीचा उल्लेख केला आहे त्यामुळे हायकोर्टाने संजय राऊत यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवलं आहे.
याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, बाबरीपासून आजपर्यंत मी मागे हटलो नाही हा ४० वर्षाचा इतिहास आहे, कारण माझ्यामागे शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि ठाकरे कुटुंब कायम पाठिशी आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अरे ला कारे करणं आमच्यात धमक आणि हिंमत आहे. राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल असे काही राज्य आहेत जी स्वत:च्या स्वाभिमानासाठी लढत असतात. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तिला कोणी पाकिस्तान म्हणत असेल, ठाकरे परिवार जे महाराष्ट्राच्या मराठी माणसाची अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल कोणी चुकीच विधाने करत असेल. तर शिवसेनेचा नेता, मराठी माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे, या सगळ्या द्वेषप्रवृत्ती विरोधात उभं राहणं, ते कोणाला अपराध वाटत असेल तर तो वारंवार करायला तयार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यावर शेकडो केसेस चालले आहे. १९९२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यावर राज्यात १५५ खटले दाखल झाले, बाळासाहेब ठाकरे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले हे माझं भाग्य आहे, सामना अग्रलेख, हेडलाईन, माझी वक्तव्ये, भाषणे, बाळासाहेब स्वत: राज्यातील आणि देशातील अनेक कोर्टात हिंदुत्वासाठी आरोपी म्हणून उभे राहिले. त्यामुळे अशाप्रकारे कोणत्याही खटल्याची मी पर्वा करत नाही, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, अस्मितेसाठी त्याच्या बदनामीविरोधात लढलो त्यासाठी मला तुरुंगात टाकणार असेल तर माझी तयारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, सिनेसृष्टी संपूर्ण देशाची आहे, त्याचे केंद्रबिंदू मुंबई आणि महाराष्ट्र आहे, त्यामुळे मी कधीही म्हणणार नाही इथं कोणासाठी दरवाजे बंद आहेत, दादासाहेब फाळके जे मराठी आहेत त्यांनी फिल्म इंडस्ट्रीची स्थापना केली, त्यांचं नावही ज्यांना घेता येत नाही. अशा अभिनेत्री आम्हाला महाराष्ट्राबद्दल, सिनेसृष्टीबद्दल शिकवतात तेव्हा गमंत वाटते, देशातील सिनेसृष्टीचा पाया महाराष्ट्राने उभा केला आहे. आम्हाला कोणी अक्कल शिकवू नये अशा शब्दात संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौतला नाव न घेता फटकारलं आहे.
कंगनानं याचिकेत काय म्हटलं आहे?
पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने अभिनेत्री कंगना राणौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कंगनाला मंगळवारी दिली, तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा दिली. पालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे पालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कंगनाने याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती. कंगनातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात एक डीव्हीडी सादर केली. त्यात खासदार संजय राऊत यांचे एक भाषण रेकॉर्ड केलेले आहे. त्या भाषणात राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचा दावा वकिलांनी केला.
बाजू मांडण्याची संधी
‘मी हे विधान केलेच नाही आणि डीव्हीडी बनावट आहे, असे राऊत यांनी म्हटले तर? तुम्ही त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे,’ असे न्यायालयाने म्हटले, तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांच्यावरही कंगनाने आरोप केल्याने त्यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा न्यायालयाने कंगनाला दिली.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.