नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या पुन्हा पंतप्रधान होण्याच्या इराद्यावर मोठं विधान केलं आहे. मला जर थोडंसं राजकारण कळत असेल, तर मी नक्कीच सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. मी काही ज्योतिषी नाही. पण मला असं वाटतं की त्यांना आवश्यक असलेलं संख्याबळ मिळणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं मला वाटतं. त्यांचं संख्याबळ घटणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तो एकमेव सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. परंतु त्यांना सरकार स्थापण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. असे झाल्यास भाजपाला पंतप्रधानपदासाठी नवा उमेदवार शोधावा लागेल.सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्या देशापुढील राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. कार्यकर्त्यांसमोर पवार म्हणाले होते की, ‘मोदी सध्या गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत, परंतु याच घराण्यातील दोन पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले, त्याचा त्यांना विसर पडला आहे. मोदी यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे विचार संकुचित असतील, तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही.’चार राज्यांच्या निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून, येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जाण्याची व निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले, परंतु याचे भाजपाने भांडवल करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो? असा टोलाही त्यांनी लगावला.