पुणे : अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. यावर नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे, त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
बारामती येथे एका कार्यक्रमानंतर शरद पवार हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी "नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही", असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
याचबरोबर, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरूनही शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते. मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल काही कृषि तज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते शेतीतज्ज्ञ आहेत, हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, अशी कोपरखळी शरद पवार यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना मारली.
("भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका )
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. नारायण राणे यांच्या पडवे मेडिकल कॉलेजचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित आहेत. तसेच, यावेळीअमित शहा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा नारायण राणे यांनी काल व्यक्त केली होती.