पटना – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळून सरकार स्थापन झालं, या निकालात भाजपानं मुसंडी मारत गेल्यावेळच्या तिप्पट जागा पटकावल्या. तर मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीत शब्द दिल्यामुळे भाजपाने कमी जागा मिळूनही पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं, पण महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली.
बिहारमध्ये सत्ता येऊन ३ महिन्याहून अधिक काळ गेला आहे, पण नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील धुसफूस आता समोर येताना दिसत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी जनता दलाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत एक मोठा खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी २ दिवसांच्या चालणाऱ्या बैठकीत सांगितले की, निवडणुकीच्यावेळी माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण हे मला माहितीच पडलं नाही असं विधान त्यांनी केले.
राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे. कारण बैठकीत निवडणुकीत हरलेल्या जेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत जेडीयू उमेदवाराच्या पराभवात भाजपाचा वाटा किती यावर प्रश्न उपस्थित झाले, यात चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि आसमा परवीन यांचा सहभाग आहे. या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, निवडणुकीत झालेला पराभव लोक जनशक्ती पार्टीमुळे नव्हे तर भाजपामुळे झाला आहे.
मटिहानी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले जनता दल यूनाइटेडचे उमेदवार बोगो सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाई. त्यामुळे त्याचा फटका जेडीयूला बसला असेल हे नाकारू शकत नाही. जे सत्य आहे ते बोललं आवश्यक आहे. जेडीयूचा पराभव होण्यामागे एलजेपीपेक्षा जास्त जबाबदार भाजपा आहे. एलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते. भाजपाच्या मतदारांनी मला मतदान केले नाही असा आरोप त्यांनी केला.
नितीश कुमारांनी सगळ्याचं म्हणणं ऐकलं
विशेषत: ज्यावेळी जेडीयूचे नेते भाजपावर आगपाखड करत होते, त्यावेळी नितीश कुमार आणि पार्टीचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मौन बाळगत सर्वांचे म्हणणं ऐकून घेतले. नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीपूर्वी ५ महिने आधी एनडीएमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा होणं आवश्यक होतं परंतु असं झालं नाही. जनता दल यूनाइटेडचे बिहारमध्ये ४५ लाख सदस्य आहेत. तरीही स्थानिक पातळीवर पक्षाचे विचार पोहचू शकले नाहीत त्याचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळाला. मागील काही वर्षात बिहारमध्ये जे काम केले गेले ते जनतेपर्यंत पोहचले नाही याची नाराजीही नितीश कुमारांनी व्यक्त केली.