"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:17 PM2024-09-24T15:17:41+5:302024-09-24T15:21:30+5:30
Ajit Pawar vs supriya sule : डीपीडीसी बैठकीत आमच्यावर दडपशाही करण्यात आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर अजित पवारांनी सविस्तर खुलासा केला आहे.
Ajit Pawar on Sharad Pawar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवारांनी प्रश्न विचारला. त्यावरून आम्हाला लेक्चर देण्यात आले आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले, असा दावा सुप्रिया सुळेंनी केल्यानंतर अजित पवार भडकले. शरद पवारांचा कधीही अपमान केला नाही. त्यांना दैवत मानत आलोय असे उत्तर अजित पवारांनी दिले. (Ajit Pawar clarified that I did not insult Sharad Pawar)
अजित पवार काय म्हणाले?
"सुप्रिया सुळेंनी सांगितले की, मी साहेबांचा (शरद पवार) अपमान केला. मी कधीही साहेबांचा अपमान केलेला नाही आणि करणार पण नाही. काही कारण पण नाही. कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे", असा खुलासा अजित पवारांनी केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "पण काहीतरी अशा पद्धतीचे नरेटिव्ह तयार करून त्यातून काही नेत्यांना आणि जनतेला सांगायचं की, साहेबांचा अपमान केला. साहेबांना असं केलं, तसं केलं. कशाचा मी अपमान करतो", असे उत्तर अजित पवारांनी सभेत बोलताना दिले.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं होतं?
अजित पवारांनी बैठकीत प्रश्न विचारण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना केला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "डीपीडीसीच्या बैठकीत शरद पवारांनी एक प्रश्न विचारला की, विकास निधीची विभागणी कशी होते? त्यावर आम्हाला एवढे मोठे लेक्चर देण्यात आले की, तुम्हाला अधिकारच नाही. हे नाही, ते नाही."
"आम्हाला शासन निर्णय दाखवण्यात आला. मी विचारले की, आम्हाला बोलायचाच अधिकार नाही. आम्हाला काहीच अधिकार नाही. मग आम्हाला बैठकीला कशाला बोलवता? पण, नंतर प्रशासनानेच मला सांगितले की, तुम्हाला निमंत्रण देऊन बोलवतात आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. ही दडपशाही आहे", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.