कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जबरदस्त फाईट सुरू असल्याचे दिसत आहे. यातच भाजपकडून टीएमसीला भगदाड पाडणे काम सुरूच आहे. एक-एक करत टीएमसीचे अनेक नेते भाजपचे कमळ आणि भगवा हातात घेताना दिसत आहेत. यातच आता, पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी मोठा दावा करत, ममता बॅनर्जींसह टीएमसीच्या संपूर्ण गटातच भूकंप आणला आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे, की 'माझ्याकडे 41 आमदारांची यादी आहे. भाजपत येण्याची त्यांची इच्छा आहे. मी त्यांना भाजपत घेतले, तर बंगालमधील सरकार कोसळेल. कुणाला घ्यायचे आणि कुणाला टाळायचे यावर आम्ही विचार करत आहोत. संबंधित आमदारांची छबी खराब असेल तर त्याला आम्ही घेणार नाही. ममता बॅनर्जींचे सरकार जात आहे, असे सर्वांनाच वाटत आहे.'
टीएमसी-भाजपमध्ये संघर्ष सुरूच -तत्पूर्वी, भाजपचे 6 ते 7 खासदार लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करतील, असे पश्चिम बंगालचे अन्न व पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी म्हटले होते. एवढेच नाही, तर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परत येण्यासाठीही टीएमसीकडे शिफारस करत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जीच घेतील, त्याचा होकार असेल तरच पुढील पाऊल टाकले जाईल, असेही ते म्हणाले होते.
भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस-डाव्यांना TMCचं निमंत्रण -तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सौगत रॉय नुकतेच पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, ''जर डावे आणि काँग्रेस खरोखरच भाजपविरोधात आहेत, तर त्यांनी भाजपच्या सांप्रदायिक तथा फुटिरतावादी राजकारणाविरोधातील लढाईत ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी.'' एवढेच नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.
आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी?पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरातच आता बंडखोरीचा सूर निघू लागला आहे. ममता बॅनर्जी यांचा सक्का भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनी आता राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटले आहे, की बंगालमध्ये बाहेरील, असा काही मुद्दाच नाही. तसेच यावेळी नाव न घेता त्यांनी घराणेशाहीवरही जोरदार टीका केली. 'घराणेशाही' राजकारणासाठी योग्य नाही, असे ते म्हणाले. यावरून कार्तिक बॅनर्जी हे भाजपत सामील होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपमध्ये जाण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, "आपल्या ऋषी-मुनींनी जे सांगितले आहे, आपल्याला त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच पुढे चालावे लागेल."
अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ -पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले.
पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते, की काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल.