सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती?; ठाकरेंनी एका सूचक विधानातून मारले अनेक पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:59 PM2021-01-18T20:59:58+5:302021-01-18T21:09:27+5:30
सध्या कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतोय; मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य
मुंबई: घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत.
उद्धव ठाकरे चांगले चालक, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा...; फडणवीसांचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपकडून वारंवार होणारी टीका, नामांतरामुळे सत्तेत असलेल्या पक्षासोबत सुरू असलेलं वाकयुद्ध या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.
कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहे, हे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. 'उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात. पण ते जेव्हा कार चालवत असतात, तेव्हा सगळं ट्रॅफिक थांबलेलं असतं. त्यामुळेच ती कार व्यवस्थित चालते. सरकार मात्र अशा पद्धतीनं चालवता येत नाही. सरकारकडे ट्रॅफिक सुरूच राहतं. यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटतं आहे,' असा टोला फडणवीसांनी हाणला.