Jharkhand government : 'मी झारखंडच काय रांचीही पाहिली नाही', चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकार पाडण्याचे आरोप लावले फेटाळून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:01 PM2021-07-29T18:01:40+5:302021-07-29T18:02:17+5:30
Jharkhand government : मी झारखंडला कधीही गेलो नाही, हे संपूर्ण प्रकरण हस्यास्पद आहे.
पुणे:झारखंडमधील सरकार पाडण्यात भाजपाचा आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. काँग्रेसकडून सतत टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. 'मी पक्षाचा काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडच का, रांचीलाही गेलो नाही', असं ते म्हणाले.
बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळे ते म्हणाले की, मी झारखंडला कधीही गेलो नाही, हे संपूर्ण प्रकरण हस्यास्पद आहे. मी झारखंडची रांचीही पाहिली नाही. झारखंडच्या 181 आमदारांपैकी एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही. मी भाजपाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. हे सगळं कपोलकल्पित आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच, नाना पटोलेंनी माझ्यावर आरोप केला, पण आमचा एकही आमदार भाजपाच्या संपर्कात नसल्याचं झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी कबूल केलं आहे. कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही काँग्रेसच्या अध्यक्षानेच स्पष्ट केलंय. त्यामुळे अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपाला बदनाम केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.