नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी ७० वा वाढदिवस झाला, देश-विदेशातून अनेक नेत्यांनी, चाहत्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, राष्ट्रपतींपासून, विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. यातच मोदी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नमो वाढदिवसाचा ट्रेंडही सुरु केला.
वाढदिवसानिमित्त मोदींना गिफ्ट काय द्यायचा असा सवाल चाहत्यांनी मोदींकडे केला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत काय गिफ्ट हवं ते सांगितले. मोदींनी रात्री उशीरा चाहत्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना ट्विटरवर त्यांची विश लिस्ट टाकली होती. त्यातून नरेंद्र मोदींनी चाहत्यांकडे वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं.
नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणाले की, अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त गिफ्ट काय हवं अशी विचारणा केली. त्यांना मला जे हवंय ते सांगतो, सध्याच्या कोरोना संकटकाळ असल्याने मास्कचा वापर करा, योग्यरित्या मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा, दो गज दूरी हे लक्षात ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, स्वत:ची इम्युनिटी वाढवा आणि आपलं वातावरण निरोगी ठेवूया असं ते म्हणाले आहेत.
त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानले आहेत, देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचा मी आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा मला देशातील नागरिकांची सेवा आणि त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी बळ देतात असं त्यांनी म्हटलं आहे.
अनेक दिग्गजांनी मोदींना दिल्या शुभेच्छा
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अनिल कपूर, माधुरी दीक्षित पासून ते रजनीकांत व चिरंजीवीपर्यंत कलाकारांनी आणि सचिन तेंडुलकरपासून ते ब्रेट लीपर्यंतच्या क्रिकेटर्संने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेल्या शुभेच्छांबद्दल कलाकार व दिग्गजांचे आभार मानले आहेत. बॉलिवूडची क्वीन आणि सध्या शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेत असलेल्या कंगना राणौतने मोदींना व्हिडिओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आपल्यासारखे पंतप्रधान देशाला लाभले हे आमचं भाग्य असल्याचं कंगनाने व्हिडिओत म्हटलं होतं. देशातील कोट्यवधी लोकं आपल्यावर प्रेम करतात, मीही त्यापैकीच एक असून आपणास भेटण्याचा योग आला, पण बोलणं कधीही झालं नाही, अशी खंतही कंगनाने बोलून दाखवली.तिचेही मोदींनी आभार मानले
काहींनी बेरोजगार दिवस केला साजरा
पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता, अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून पाळला होता. मेरठमधील सपाच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी कटोरा घेऊन मोदींकडे, मोदी सरकारकडे नोकरीची मागणी केली. गुरुवारी मेरठच्या आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर समाजवादी युवजन सभेच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केले. देशातील युवक बेरोजगार आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. देशातील युवा नोकरी मागत आहे, पण सरकारने या तरुणांच्या हातात कटोरा दिलाय, अशी घोषणाबाजी युवकांनी केली.